active teacher : ........म्हणून मी नख वाढवलं सर!

Sunday, 5 April 2020

........म्हणून मी नख वाढवलं सर!

             
              साधारण 8-9 वर्षापुर्वीची गोष्ट. मी नुकताच विजयदुर्ग शाळेत हजर झालो होतो. जेमतेम २ वर्ष झाली असतील. तरुण असल्याने fashion ची आवड होती. मग काय जीन्स , short shirt घालणे, केस थोडे वाढवणे आदी गोष्टी आल्याच. आणि त्यात भर म्हणजे मला करंगळीचं नख वाढवायची सवय होती. माझ्या केस, नखे वाढविण्याने मुलांवर त्याचा परिणाम होईल याचा कधी विचारच आला नाही. त्या दिवशी शनिवार होता. सकाळची शाळा! परिपाठ, कवायत झाल्यानंतर माझ्या मुख्याध्यापकांनी मुलांचे केस , नखे तपासायला सुरवात केली. मी बागेत झाडांना पाणी घालत होतो. थोड्या वेळाने मुख्याध्यापक ठाकरे सरांनी मला हाक मारली. मी गेलो. तिसरीतला एक मुलगा नखे वाढविल्यामुळे उभा होता. सर म्हणाले," सर, याची नखे बघा जरा." मी नखे बघीतली. नखे भरपूर वाढलेली होती. करंगळीचं नख तर प्रमाणापेक्षा जास्तच वाढले होते. मी ओरडलो त्याच्यावर " अरे, काय हे? किती नखे वाढलेत! कापता येत नाहीत काय ? आणि हे करंगळीचं नख एव्हढं कशाला वाढवलास? " मी त्याच्या करंगळीला पकडून म्हंटले. पण त्यानंतर जे झालं त्याची मी कल्पनाच केली नव्हती. तो मुलगा सरळ मला म्हणाला,"सर, करंगळीचं नख मी तुमचं बघून वाढवलंय! मला तुमच्यासारखं नख वाढवायचंय!" क्षणभर काय बोलावे ते सुचेनाच. ठाकरे सर माझ्याकडे बघत होते आणि मी निशब्द.... 
                मुलं आपल्याला इतकं follow करत असतात ते त्यादिवशी समजलं.आई, वडिलानंतर शिक्षकाचे नाव का घेतात ते खऱ्या अर्थानं त्यादिवशी मला समजलं. मी लगेच त्याच्याच पुढ्यात माझ्या करंगळीच नख कापून टाकलं आणि त्याला म्हंटलं की बघ आता तर माझं नख मोठं नाहीये मग तूझं पण कापूया. आणि मी लगेच त्याचं नख कट केलं. आणि त्याला बोललो, " हे बघ बाळ, तू माझ्या नखासारखं नख वाढवलास !आता मग मी जसा अभ्यास करून शिक्षक झालो तसा तू पण चांगला अभ्यास करून एक चांगला नागरिक हो." नोकरीच्या सुरुवातीलाच मला हा धडा शिकवल्याबद्दल त्याचे मनातच आभार मानले.... त्यादिवशीच ठरवलं की मुलांच्या समोर कधीच चुकीचं बोलायचं नाही आणि चुकीचं वागायचं पण नाही.... आणि  आजपर्यंत ते कटाक्षाने पाळतोय....  

1 comment:

  1. आपण शिक्षकच लहान मुलांचे आदर्श असतो. आणि मुले ही अनुकरण प्रिय असल्याने कळत-नकळत आपले अनुकरण करत असतात. त्यामुळे मुलांसमोर शिक्षकाने प्रत्येक गोष्ट जपून करणे आवश्यक आहे..सुंदर अनुभव....

    ReplyDelete

***************************************